संपादकीय

नमस्कार मंडळी,

म्हणता म्हणता हे वर्ष निम्म्याहून अधिक सरलेही! जुलै महिन्याची सुरुवात झाल्यावर आम्हाला मैत्रचा पुढील अंक प्रकाशित करण्याचे वेध लागले. २०२० ह्या वर्षातील 'मैत्र'चा हा तिसरा अंक आपल्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे.

ह्यावर्षीचा उन्हाळा दरवर्षीपेक्षा जरा हटकेच आहे. लहानपणीचा उन्हाळा म्हटले की आठवते ती वार्षिक परीक्षा संपून लागलेली सुट्टी आणि सुट्टीत केलेली मौजमजा. मामाकडे गावाला जाणे, विहिरीच्या नाहीतर टाकीच्या पाण्यात डुंबणे, भरपूर खेळणे, खाणे-पिणे आणि सकाळी उशिरा उठणे हा दिनक्रम. खेळ म्हंटले की मैदानी खेळ, 'विषामृत', 'आट्या-पाट्या', 'दगड का माती', 'टिपरी पाणी', 'लंगडी', 'लगोरी', 'माझा रंग सांगू का', 'खो-खो', 'कबड्डी', 'आंधळी कोशिंबीर', 'रुमाल-पाणी', 'बॅट-बॉल', 'जोडी साखळी' असे बरेच. मग घरात येऊन आमरस पोळीचे जेवण आणि त्यानंतर बैठे खेळ. सुरुवात सागरगोटे, काचा पाणी ह्यांनी. पुढे भातुकली - मग त्यात आईने दिलेला खाऊ व भावला-भावलीचे लग्न हे एकदा तरी झालेच पाहिजे. मग पत्त्यांचा डाव चालू झाला की 'सात-आठ', 'पाच-तीन-दोन', 'भिकार-सावकार', 'बदाम-सात', 'चॅलेंज' किंवा 'ब्लफ', 'रम्मी', 'झब्बू', 'नॉटॅठोम' अशी ही यादी संपता संपणार नाही.

शिवाय खेळात एकमेकांना हरवण्याची मजा वेगळीच. हे खेळ खेळतांना मध्येच उठून स्वयंपाकघरात चोरून रसना पिताना किंवा पेप्सीकोला खाताना आईचे धपाटे खाणे हे आलेच. हे सगळे कमी की काय म्हणून घरातले खेळ संपले की संध्याकाळी बागेत जाणे, भेळ, आईस्क्रीम किंवा बर्फाचा गोळा खाणे, उसाचा रस पिणे, सिनेमा बघायला जाणे आणि मग घरी येऊन गच्चीवर थंडगार वाऱ्यात, चांदण्यांनी भरलेल्या स्वच्छ आकाशाखाली गाद्यांवर पडून भुताखेतांच्या गोष्टी सांगत, टवाळक्या करत शेवटी दमून झोपणे. ती मजाच काही और होती. भावंडे आणि मित्र-मैत्रिणींसोबत धमाल करण्याचे हे दिवस. मैत्रीच्या नात्याबाबत पु.ल.देशपांडे म्हणतात -“मैत्री - एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही. रोज भेट व्हावी असं काही नाही. एव्हढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला ह्याची जाणीव असणं ही झाली मैत्री. शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जपलं. “

गंमत म्हणजे युनायटेड नेशन्सनी २०११ साली घोषित केल्यापासून ३० जुलै हा ‘आंतरराष्ट्रीय मैत्री दिन ‘म्हणून साजरा केला जातो. आणखी गंमत म्हणजे १७२९ साली ह्याच दिवशी बाल्टिमोर शहराची स्थापना झाली आणि आज २९१ वर्षांनी, ह्याच दिवशी बाल्टिमोर मराठी मंडळातर्फे 'मैत्र'चा अंक आम्ही प्रकशित करत आहोत! ह्यावर्षी जरी कोरोनाग्रस्त उन्हाळ्यामुळे आपण त्रस्त असलो, प्रत्यक्ष भेटी जरी होत नसल्या तरी आपल्या मैत्रीच्या गाठी अशाच घट्ट राहोत!

उन्हाळा म्हटला की बागकाम आलेच. आपल्यापैकी अनेकजण सध्या घरून काम करत आहेत. त्यामुळे बागेसाठी वेळ देणे जास्त प्रमाणात शक्य होत असेल. तुमच्या बागेविषयी, फळ-फुलझाडांच्या लागवडीविषयीची माहिती मैत्रसाठी लिहून पाठविण्याचे आवाहन आम्ही केले होते. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी जुलैच्या अंकासाठी आपल्या बागकामासंबंधीचे लेखन रंगीबेरंगी प्रकाशचित्रांसह पाठवले. त्या सर्वांचे मनापासून आभार. तसेच मागील अंकाप्रमाणे ह्या अंकामध्ये सुद्धा आम्ही मुलांकरता मराठी प्रश्नसंच प्रकशित करत आहोत. अनुभव, ललित लेखन, कथा, कविता आणि बालकलाकारांनी पाठवलेल्या साहित्याची रेलचेल ह्या अंकामध्ये आहे.

ह्या उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी तुम्ही राबवत असलेले उपक्रम, समर कॅम्पसाठीचे पर्याय निवडतानाचे अनुभव, घरून काम करतानाचे अनुभव, स्वयंपाकाचे नवे प्रयोग, सामाजोपयोगी कामांचे अनुभव मैत्रच्या पुढील अंकासाठी लिहून पाठवा. ह्याशिवाय तुम्ही किंवा तुमच्या मुलांनी काढलेले फोटो, चित्रे, इतर विषयांवरील लेखन, कथा, कवितासुद्धा आम्हाला पाठवा. मैत्रचा पुढील अंक ऑक्टोबर अखेरीला प्रकाशित होईल. त्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत तुमचे साहित्य editor@baltimoremarathimandal.org या पत्त्यावर पाठवा.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून बाल्टिमोर परिसरात आलेल्या आपल्या शेजाऱ्यांची ओळख ‘गड्या आपुला गाव बरा’या सदरातून आपल्याला होत असते. ह्या अंकात पुणे जिल्हा आणि परिसरातून आलेल्या शेजाऱ्यांशी आपली ओळख होणार आहे. ऑक्टोबर अखेरीस प्रकाशित होणाऱ्या पुढील अंकात आपण महाराष्ट्राबाहेरील राज्यांतून आलेल्या आपल्या मराठी शेजाऱ्यांशी ओळख करून घेऊ. तुम्ही उत्तर व दक्षिण भारतातील महाराष्ट्राबाहेरील राज्यांमधले असाल तर आम्हाला editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर तुमची माहिती नक्की कळवा.
तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!
कळावे,
संपादक मंडळ

Comments

Rohit said…
छान संपादकीय
ruddhi said…
मस्त 👍👍👍