आप्पाची गोष्ट

वसंत ऋतूची चाहूल लागली की अंगणात ट्युलिप्स आणि डॅफोडिल्स फुलतात, हयासिन्थस जमिनीबाहेर येऊ पाहतात. हळूहळू इतर कोंबही डोकी वर काढतात. काही कोंब ओळखीचे असतात, हवेसे असतात. काही ओळखीचे असले तरी नकोसे असतात. मात्र इतर अनेक कोंबांची, झुडपांची, रोपांची पुरेशी ओळख नसते आणि मग ते ठेवावेत की उपटावेत असा प्रश्न पडतो. उपटावेत तर एखाद्या चांगल्या फुलझाडाचा बळी जाईल की काय आणि ठेवावेत तर ते फोफावणारे तण निघेल की काय, असे वाटत राहते. शिवाय हे अनोळखी रोप एखाद्या वृक्षाचे बाळ असेल तर ही “वृक्षी रोपे” त्यांची मुळे लगेच घट्ट करतात आणि मग नंतर ती उपटायला जास्तीचे श्रम खर्चावे लागतात.

काही दिवसांपूर्वी कोणतातरी खेळ फोनवर खेळत असताना 'पिक्चर धिस' नावाच्या ऍपची जाहिरात मी पाहिली आणि तत्काळ त्या आप्पाला माझ्या फोनवर उतरवून घेतले. हा आप्पा झुडपा-रोपांचे फोटो काढले की त्यांचे नाव-गाव-फळ-फूल वगैरे सगळी माहिती आपल्याला पुरवतो. हा आप्पा मला पूर्वीच का भेटला नाही बरे? मग वेळ न दवडता मी आप्पाला बाहेर अंगणात नेले आणि त्याला 'अखिल अमेरिकी माझ्या अंगणातील झाडे ओळखा' संघटनेचा प्रमुख करून टाकले. माझ्या माहितीच्या मित्र आणि शत्रू रोपांची माहिती आप्पाला विचारून त्याची आधी परीक्षा घेतली आणि तो ह्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर मी अनोळखी झाडांची ओळखपरेड सुरू केली.

गेल्या वर्षी एका कुंडीत एक किंचित काटेरी पानांचे रोपटे वाढले होते. ते पुन्हा उगवलेले पाहून त्याची ओळख करून घेतली तर आप्पाच्या मते ते फोरसिंथिया होते. मग त्याला उपटण्याचा विचार मी रद्द केला. एक चेरी ब्लॉसमचे आणि ब्लॅक चेरीचेही रोप सापडले. ते अर्थातच नको तिथे उगवलेले असल्यामुळे त्यांची रवानगी अंगणात योग्य ठिकाणी केली. असे करता करता मी एका छान हृदयाकृती पाने असलेल्या रोपापाशी आले. मागच्या वर्षीही अशी अनेक रोपे जिथेतिथे उगवलेली मी पाहिली होती. ह्याचे पान किती छान आकाराचे आहे असा विचारही केला होता. आपल्याला हवी असणारी रोपे अशी फुकटात आणि भरपूर प्रमाणात कधीच वाढत नसतात. त्यामुळे ह्या “हृदयी” रोपांची एकूण रोपसंख्या पाहता ते आक्रमक आणि नकोसे (invasive) रोप असणार हे उघड होते. मी आप्पाला त्या रोपावर सोडताच आप्पा म्हणाला की हे आहे लसणी-सरसों, अर्थात गार्लिक मस्टर्ड आणि तेही चक्क खाण्यायोग्य! त्याच्या मुळांना आणि पानांना लसणाचा फिका स्वाद असतो आणि ते मोहरी वर्गात मोडत असल्यामुळे त्याचे नाव पडले गार्लिक मस्टर्ड. त्याचा पेस्टो छान होतो म्हणे. ही जिथेतिथे गर्दी केलेली रोपे खाण्यायोग्य आहेत म्हटल्यावर मला झालेला आनंद काय वर्णावा! तत्काळ मी गार्लिक मस्टर्ड पेस्टोची पाककृती शोधली आणि अंगणातून पाने तोडून आणली. 'पिक्चर धिस' आप्पाच्या कृपेने आमचे कुटुंब ‘पास्ता विथ गार्लिक मस्टर्ड पेस्टो’ आनंदाने स्वाहा करते झाले!

सध्या घरून काम करायचे असल्यामुळे आप्पाला अंगणात फिरवून आणण्याचा उद्योग मी सकाळ-संध्याकाळ सुरू केला. यथावकाश मला माझ्या अंगणात उगवलेल्या ब्रॉड-लीफ डॉक, नॉर्दर्न स्पाईस बुश, ब्लॅकबेरी अशा काही उपयोगी आणि जॅक इन द पल्पिट, वाईनबेरी, व्हर्जिनिया क्रीपर, वगैरे अनेक निरुपयोगी झाडांचा शोध लागला. हे ब्रॉड-लीफ डॉक म्हणे थोडे कडू असते. वसंतात उगवणारी कोवळी पाने तशी कमी कडू असतात. सॅलडमध्ये घालता येतील, कच्ची खाता येतील इतपत कडू. मात्र पाने जून होत गेली की त्यांचा कडवटपणा वाढत जातो. मी विचार केला की मेथी आणि कारल्याच्या भाज्यांची चव चाखलेल्या आपल्या भारतीय जिभेला ह्या कडू ब्रॉड-लीफ डॉकने असा कितीसा फरक पडणार आहे? मग ब्रॉड-लीफ डॉक घरात आणून त्यांची भाजी करून पाहिली. जून पाने वापरताना पानांच्या अधिक कडू असलेल्या मधल्या शिरा काढून टाकल्या आणि मेथीची दाण्याचे कूट आणि नारळाचा खव घालून करतो तशी कोरडी भाजी केली. चव पाहण्यासाठी म्हणून मी किंचित भाजी तोंडात टाकली तर तोंड कडूजार झाले.

म्हटले की कडूपणात मेथीचा भाऊ निघेल असे वाटणारा ब्रॉड-लीफ डॉक मेथीचा पणजा निघतो की काय? पण बहुतेक मी नेमका पानाच्या शिरेचा भाग खाल्ला की काय वा थोड्या वेळात मुरून भाजीचा कडवटपणा कमी झाला की काय कोण जाणे, पण जेवायला बसलो तेव्हा हा मेथीचा भाऊच निघाला. भाजी छान चवदार लागली. मग गार्लिक मस्टर्डच्या पानांची कोरडी भाजी करून पाहिली आणि तीही छान झाली. अशा रीतीने आप्पाच्या कृपेने आम्ही नव्या पदार्थांच्या चवी चाखल्या.
माझ्या अंगणात नॉर्दर्न स्पाईस बुशची खूपशी झाडे आहेत हेही मला आप्पामुळेच कळले. स्थानिक अमेरिकी, अर्थात नेटीव्ह अमेरिकन्स, ह्या झाडाच्या जवळपास सर्व भागांचा औषधी उपयोग करतात. ह्याचा काढा रक्तशुद्धी, पांडुरोग, संधिवात/आमवात आणि सर्दीवर उपयुक्त असतो म्हणतात. मग नॉर्दर्न स्पाईस बुशच्या पानांचा काढा करून पिऊन पाहिला. चवीला गवती चहाच्या फिक्या काढ्यासारखा लागला. उरलेला काढा मात्र थोड्याच वेळात काळा पडला. नॉर्दर्न स्पेस बुशला उन्हाळा संपता संपता छोटी लालचुटुक फळे लागतात. ती पानगळीच्या मौसमात पिकली की त्यांना ऑलस्पाइससारखा स्वाद येतो आणि ती स्वयंपाक आणि बेकिंगमध्ये वापरता येतात. आता येत्या मैसामात त्यांचा वापर करून बघणे ओघाने आलेच.
ह्या आप्पानेच मला वुड सॉरेल आणि क्लोव्हरमधला फरक समजावून सांगितला. वुड सॉरेल खाण्यायोग्य असते. खाऊन पाहिले तर चिंचेची पाने कशी आंबट लागतात तशी चव लागली. आता मी वुड सॉरेलची चटणी करून पाहण्याचे ठरवले आहे. क्लोवरही म्हणे खाण्यायोग्य असते, पण चव तुरट असते.

आप्पाने मला अधूनमधून दगाही दिला. आप्पाने फोरसिंथियाचे सांगितलेले बाळ रोपटे काही दिवसांनी थोडे मोठे झाल्यावर चेरी ब्लॉसमचे असल्याचे सांगू लागला. मग पुन्हा त्याची जागा बदलावी लागली. आप्पाने रास्पबेरीचे रोप आहे सांगितल्यामुळे मी कौतुकाने वाढवलेले रोप निरुपयोगी व्हाइट एवन्स निघाले. मग उपटून टाकले. पण एकंदरीत ह्या आप्पाने मला बरेच काही शिकवले आहे आणि ह्यापुढेही शिकवेल. तर अशी ही आप्पाची गोष्ट.


वरदा वैद्य: 


Comments

माहिती व रंजन दोन्ही छान साधलंय