व्यवसाय अभियांत्रिकी परंतु मनानं शेतकरी

माझा जन्म नाशिकला झाला. माझं बालपण, शालेय, विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत २२५ स्के.फुट घरात झालं. लोकलमधून जाता-येता रेल्वे रूळालगत गटाराच्या पाण्यावर पोसलेला भाजीपाला पाहून खूप वाईट वाटायचं. हीच भाजी मुंबईत पुरवली जाते ह्याचं वैषम्य वाटायचं. काहीतरी करावं. रसायनविरहित भाज्या कशा प्रकारे मिळवता येईल याचा विचार तरळून जायचा. स्वप्न पूर्णत्वास नेणाऱ्या, घड्याळावर चालणाऱ्या मुंबईत मात्र माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. किंबहुना सिमेंटच्या पदपथावर माझं निसर्गप्रेम अंकुरलंच नाही.
अमेरिकेत आल्यावर घरात मी छोटी रोपं तयार करून कुंड्यांमध्ये लावू लागलो. पण सूर्यप्रकाश अपुरा असल्याने ती वाढत नव्हती. मी कोलंबिया कम्युनिटी गार्डन वेबसाईटवर संपर्क साधून भाडेतत्त्वावर जागा मिळवली. तिथे भरपूर प्रयोग करून माझी हौस भागवून घेतली.



आम्ही घर घ्यायचं ठरवलं. ते खरेदी करतानाही घराच्या आतील सुविधांपेक्षा बाहेरील रिकामी जागा मला खुणावू लागली. हळुहळू मी तिथे छोटे छोटे वाफे केले. विविध रोपे तयार करून भाज्यांची लागवड केली. ठिबकसिंचन पद्धतीने पाणी पुरवू लागलो. यासाठी लागणारं कंपोस्ट-गांडूळ खत घरातील ओला कचरा, सुकलेली पानं वापरुन करु लागलो. बघता बघता माझ्या बागेत विविध भाज्या, फुलं, फळं तरारलेली दिसू लागली. घेतलेलया कष्टाचं चीज झालं. विविध भाज्या- वांगी, टोमॅटो, बटाटा, कांदा, ढोबळी मिरची, दुधी भोपळा, भेंडी, फरसबी, गाजर, मेथी, पालक, अळू, कोथिंबीर, कलिंगड, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, काकडी- तसेच विविध फुलं- मोगरा, गुलाब, कार्नेशन, जरबेरा, डेलिया, सूर्यफूल – लावली. बागेत रंगबेरंगी फुल पाखरं दिसू लागली.


गेल्यावर्षी माझ्या मित्रपरिवाराला आठवड्याचा सेंद्रीय भाजीपाला पुरवू शकलो. ऑफिसचं काम सांभाळून ऑफिसनंतर भाजीपाला पुरवण्याची घरपोच सेवा देतांना माझी दमछाक झाली. पण हे सर्व खूप मानसिक समाधान देऊन गेलं. यापुढेही मला हरितगृह (green house) बांधायचं आहे. भारतीय फळांसाठी प्रयत्न करायचे आहेत. दुकानांमधील चकचकीत पॉलिश केलेली फळं-भाज्या बघून मनात विचार तरळून जातात की आपल्या पोटात किती विषारी रसायनं जात असतील! या विचारांनी माझी इच्छा अधिकच बळावते. यासाठी मी काही फळांची रोपे तयार केली आहेत - आंबा, पेरू, फणस, अंजीर, सिताफळ, लिंबू इ. बघूया किती साध्य होते ते. आमच्या दोघांचे आई-बाबा आल्यावर ते ही खूष होतात. त्यांचाही वेळ मजेत जातो. हे सर्व करतांना माझ्या पत्नीने- श्यामलने- मला खूप सहकार्य केलं. त्याशिवाय हे शक्यच नव्हतं. विशेष म्हणजे माझा ७ वर्षांचा मुलगा राणाक यालाही हे आवडतं. तो मदतीसाठी तत्पर असतो. व्यापारीतत्त्वावर हे करणं शेतकऱ्यांना कठीण आहे हे मी जाणतो. पण आपण सर्वांनी आपल्याला लागणाऱ्या थोड्या भाज्या आपल्या अंगणात वाढवायला हरकत नाही.


अभिजित होनराव:

Comments