मोदक

बघता बघता श्रावण सरला
भाद्रपद येऊनी उभा ठाकला
मन होई कासावीस किती
जमेल ना का होईल फजिती?

किती किती ते प्रयोग करावे
तेल, तूप वा दूध मिसळावे
प्रश्न हे पडती मला किती
तांदूळ घ्यावे का घ्यावी पिठी?

नव्या पिठीचा मान निराळा
जुनी नेहमीच करी घोटाळा
कितीही चाळा कितीही मळा
सारण येई कापूनी गळा

शेवटास जेव्हा जमते उकड
नव्या पायरीची नवीच निकड
आता पाऱ्या कराव्या किती
मनी एकवीस, पण जमतील किती?

लिंबाएवढा घेऊन गोळा
पाऱ्या केल्या त्याला सोळा
सारण भरूनी तोळा तोळा
नाजूक हाती मग ते वळा

चाळणीत मग ठेऊनिया सारे
द्यावे त्यांना वाफेचे वारे
येता सुगंध दरवळणारे
समजा झाले मोदक न्यारे

शुभ्रधवल अन् नितळ कांती
त्याच्या अंतरी सारण रसवंती
साथ तुपाची त्याला मिळती
अहा! स्वर्ग दुजा कुठला या प्रांती!


१२१ मोदकांचा नैवेद्य


मोदक करण्यात गुंतलेले हात  


रोहित कोल्हटकर: 



Comments