माझी बाग

नमस्कार, मी अंजली नरेन्द्र पाटील. मला बागकामाची फार आवड आहे. माझी खूप इच्छा होती की अमेरिकेत माझी स्वतःची बाग असावी. ह्या वर्षी माझे ते स्वप्न पूर्ण झाले. आम्ही ह्याच वर्षी मेरीलँड राज्यात कोलंबिया शहरात घर घेतले आणि घराच्या मागे आणि पुढे मोकळी जागा असल्याने मस्त बाग करता आली. हा माझा पहिलाच अनुभव पण सांगायला अगदी आनंद होतोय की मला छान यश आले. भरपूर प्रकारच्या हिरव्या भाज्या पिकवता आल्या. भरभरून स्वाद घेता आला. ताज्या आणि रसायनमुक्त भाजीपाल्याचा मनसोक्त आनंद घेता आला.

मार्च महिन्यात मी सुरवात केली ती मेथी, शेपू, कोथिंबीर आणि पुदीन्याने. आश्चर्य म्हणजे पेरलेले सगळेच भरभरून उगवले. मग मी हिरवी मिरची, ढोबळी मिरची, टोमॅटो, भेंडी, पालक, काकडी, लसूण, कांदा, गाजर आणि वाटाणे ह्यांची बियाणे वापरून आम्ही घरीच रोपे तयार केली. घरच्या स्वयंपाकघरातल्या उरलेल्या अन्नाचा खत म्हणून उपयोग केला.

खारूताई, ससे, हरणी व काही पक्ष्यांपासून थोडी काळजी घ्यावी लागली पण जास्त काही नुकसान न होता बाग मस्त बहरून आली. रोपे लहान असताना थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. ऊन, वारा, जोराचा पाऊस ह्यापासून थोडी जास्त काळजी घेतली की बराच फरक पडतो. दोन महिन्यांत रोपे मोठी होऊन त्यांना फळे यायला सुरुवात झाली.



फुलांचीही आवड असल्याकारणाने गुलाब, झेंडू, मोगरा, सदाफुली अशा विविध प्रकारांची फुलावडही सजवली. माझ्या मुलीने मोगऱ्याच्या गजऱ्याचा आनंदही घेतला. ह्या कोविड१९च्या परिस्थितीतसुद्धा मला माझ्या बागेमुळे कधी कंटाळा आल्यासारखे वाटले नाही. 


अंजली पाटील:


Comments