हरवलेले सोवळे

१४ मार्चपासून सुरु झालेली देशभरातील टाळेबंदी २० मार्चनंतर अधिक कडक झाली होती. प्रत्येकजण घरकैदी झाला होता. आयुष्यात नंदकिशोरने असले जगणे कधी अनुभवले नव्हते वा कुणी जगल्याचे ऐकलेदेखील नव्हते. घरकोंडी सुरु व्हायच्याआधीचा भरलेला किराणा आता २७ एप्रिलपर्यंत पुरला होता. दूध वगैरे नाशिवंत जिन्नस तर कधीच संपले होते पण आता डाळी-साळीदेखील संपायला आल्या होत्या. पुण्यातल्या मध्यमवर्गीय, ३ वा ४ खोल्यांच्या फ्लॅट संस्कृतीत रहाणारा नंदकिशोर किती सामान गोळा करुन ठेवू शकणार होता? तेही उंदीर आणि घुशींपासून वाचवायचे कसे? डब्यांमधील धान्य सुरक्षित पण पोती कशी सांभाळणार? पौड रस्त्यावरील स्वामी रेसिडेन्सीमधील सातव्या मजल्यावर पूर्वेकडील ४ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये नंदकिशोर, त्याची पत्नी मालती, अकरा वर्षांचा मुलगा वेदान्त आणि आठ वर्षांची रेणुका राहात होते. अत्यावश्यक सेवेशी निगडित दुकाने आजकाल फक्त दुपारी बारा ते सायंकाळी आठपर्यंत उघडी असत. त्यातही मोजक्याच लोकांना एकावेळी आत सोडत होते; बाकीच्यांनी बाहेर रांग लावा! खूप गर्दीत अडकू नये म्हणून नंदकिशोर साडेअकरालाच बाहेर पडला होता. सोमवार असूनदेखील रस्त्यावर काहीच गर्दी नव्हती. कशी असणार? शाळा, बरीचशी दुकाने, कार्यालये, महाविद्यालये, सारे काही बंद! संपूर्ण देशात कोरोनाने मृत्युभयाचे थैमान माजवले होते.

नेहमी पहाटेच्या काकड आरतीपासून आवाजाची स्पर्धा करणारे शहर आताशा एकदम शांत होते; जणू काही कुंभकर्णाने आपली निद्रा सुरु केली होती आणि सोबत शहरही त्यात सामील झाले होते. झोप लागून आताशी दोन महिने होत आले होते. केव्हा उठणार होते देवच जाणे.

गंधर्व लॉजजवळील नेहमीच्या भाजीपाल्याच्या ठेल्यांपैकी आज एकही दिसत नव्हता. श्रीकृष्ण मार्केटसमोर ह्याच्या सोसायटीबरोबर आजूबाजूच्या दहा सोसायटींच्या लोकांनी अगोदरच भली मोठी रांग लावली होती. म्हणजे ह्याला निघायला तसा उशीरच झाला होता. आपल्या ह्युंडाईतून हा पुढे जात जात आता विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचला. येथे लक्ष्मीनारायण बाजार खूप मोठा असल्याने वेळेवर आत जाता आले. घरी जायच्याआधी औषधे व मोबाईलचा डोंगल घ्यायचा होता. बाहेर ऊन तापले असल्याने ह्याने दूध, दही घेणे टाळले.

बाजूच्या सेवा मेडीकलमधून औषधांचे काम सोपे झाले पण डोंगलसाठी मोबाईल शॉपीमध्ये तासभर वेळ गेला. मग पूना बेकरीतून पाव आणि खारी घेवून हा परतीच्या मार्गाला लागला. एव्हाना चार वाजायला आले होते. इमारतीजवळच्या दुग्धालयातून दूध, दही वगैरे घेवून घरी पोहचेपर्यंत पाच वाजले होते. सामान घेऊन घरात शिरत असतांनाच मालतीने घाईघाईने दरवाज्याच्या दिशेने पावले टाकीत त्याला थांबवण्यासाठी उजवा पंजा पुढे केला. “अरे, अरे, तिथेच थांब. आधी सर्व साफ करावं लागेल, जंतूनाशक फडक्याने पुसावं लागेल हे सारं. जा, आधी अंघोळ कर.” पप्पांकडे धावणाऱ्या रेणुकाला मालतीने डाव्या हाताने अडवले. “आधी पप्पांची स्वच्छ अंघोळ होऊ दे मग पप्पांना भेट. आत्ता बाहेरून आले ना पप्पा!” नंदकिशोर तसाच मोरीत गेला व अंघोळीच्या नळाखाली उभा राहिला. थंड पाणी अंगावर पडल्यावर थकवा जात छान अल्हाददायी वाटू लागले होते.

“मेल्या, व्दाड, हलकट...” तोंडाबरोबर आजीचा उजवा हात नंद्याच्या पाठीवर सटासट पडत होता. आजीने डाव्या हाताने नंद्याच्या उजव्या दंडाला घट्ट पकडून ठेवले होते. अनेक सकाळी दहा वाजेच्या आसपासचा हा प्रसंग अख्ख्या वाड्याला आता सवयीचा झाला होता. सहा वर्षांच्या खोडकर नंदूने आज पुन्हा आजीच्या स्वयंपाकघराची लक्ष्मणरेषा ओलांडून आजीची

आतापर्यंतची मेहनत व अन्न वाया घालवले होते. सारे केलेले आता गायीला, कुत्र्याला व भिकाऱ्यांना जाणार होते. आजीला पुन्हा अंघोळ करून नव्याने स्वयंपाक करावा लागणार होता.

समज येण्याआधीपासून नंदूने आजीचा सोवळ्यातला स्वयंपाक पाहिला (आणि खाल्ला) होता. स्वयंपाकाची सुरुवात आजी अंघोळीने करी. स्वयंपाकघर स्वच्छ सारवलेले (अंघोळी आधी सारवणे व्हायचे), सोवळ्यातले पाणी (स्वच्छ भांड्यांमध्ये भरलेले पाणी; ज्याला इतर कोणालाही स्पर्श करण्याला मज्जाव असायचा), खाण्याचे जिन्नस पाण्याप्रमाणेच नीट ठेवलेले असत; इतरांच्या स्पर्शांपासून दूर. आजी अंघोळ झाल्यानंतर भाज्या धुवून, निवडून तयार करी, मग भाताचे आधण चालू असता भाकरी किंवा कणीक मळे, वगैरे. बऱ्याच आठवणी आता थोड्या धुरकट झाल्या होत्या. स्वयंपाकघरात फक्त ज्यांनी नुकतीच अंघोळ केली आहे आणि जे बिलकूल उंबरठ्याबाहेर पडले नाहीत, अंघोळीनंतर शौचाला गेले नाहीत, त्यांनाच फक्त प्रवेश असे, तो पण आजीच्या परवानगीनेच. स्वयंपाकाचेवेळी कोण, केव्हा, कसे, कोठपर्यंत आजीजवळ जाऊ शकेल ह्याची भलीमोठ्ठी अन किचकट नियमावली नंदूच्या बालमनाच्या समजेपलीकडील होती. महिन्यातून काही दिवस आईला ‘विटाळ’ लागायचा म्हणजे काय व्हायचे हे त्याला कळायचेदेखील नाही. आईला “कावळा शिवला” म्हणून आई चार दिवस स्वयंपाकापासूनच नव्हे तर सर्व कामांपासून दूर. रमाकाकूला आणि काही ताईंना देखील नेहमी कावळा शिवायचा. असा कसा ह्यांना दर महिन्याला कावळा शिवतो? बाबांना का नाही शिवत? आजीला का नाही? मला का नाही? सोवळ्यातला एक विटाळ अंघोळ करून अन दुसरा स्वयंपाक करून सुटतो मग कावळ्याचा विटाळ चार दिवस का? असले प्रश्न विचारून नंदू दरवेळी सर्वांना वैतागून सोडी. कुणीच त्याला समाधानकारक उत्तर देत नसल्याने तो असा व्दाडपणा करत राही व आजीचे धपाटे अन लाटणे खात राही...

रेणुका आता मोरीचे दार जोरजोरात ठोकत होती. “पप्पा, आटपा ना लवकर, पप्पा.

विचारांची तंद्री जरी तुटली असली तरी आठवणींच्या सरी आता संततधार बरसायला सुरूवात झाली होती. गेल्या महिन्याभरातील बदललेल्या जीवनशैलीने बालपणीच्या आठवणी एक वेगळ्याच वैचारिक दृष्टिकोनातून दिसू लागल्या होत्या. त्याला आता बरेचसे आठवत होते. बाहेरून आल्यावर सर्वांना हात, पाय, तोंड स्वच्छ धुवायची सवय होती, तशीच जेवणाआधी आणि नंतर देखील! पिण्याच्या पाण्याच्या माठाला शिवायचीदेखील बंदी होती. पाणी देणारे ठराविकच हात, माठात हात घालणे म्हणजे एक भयंकर गुन्हाच होता. सोवळे, विटाळ, स्वच्छतेची पराकाष्ठा ह्या साऱ्या गोष्टी मोठे होत असतांना गावंढळ वाटत. वाटे, असले कसले बुरसटलेले विचार ह्यांचे? काय होते हात लागल्यावर? का बरे एवढा टोकाचा अट्टाहास?

कोरोनाने मात्र सारे काही आता नीटनेटके समजावले होते. डोळ्यांना न दिसणारा, स्पर्शालाही न जाणवणारा एक विषाणू काय थैमान घालू शकतो हे सर्व आता ह्याची देही, ह्याची डोळा अनुभवल्याने ह्याला आता आपल्या सनातनी जीवनशैलीतील कारणे समजू लागली होती. पूर्वीच्या काळी वैद्यकीय सेवा आजसारख्या प्रगत नव्हत्या. महामाऱ्यांची साथ बऱ्याचदा येई. प्रत्येक घरात दहा बारा पोरे झाली तरी त्यातली साधारण चार सहाच तरुणाई पाहू शकत. ज्या गोष्टींची हा अडाणीपणाचे लक्षण म्हणून घृणा करे, त्यापैकी बऱ्याच गोष्टी त्याला आता चाळीशीत आकळत होत्या.

महामाऱ्यांसारख्या अनोळखी रोगांशी लढण्याचे महत्वाचे हत्यार म्हणजे सर्वप्रथम त्यांना आपल्या जीवनात येऊच न देण्यासाठी दक्षता घेणे! हात-पाय धुणे, सोवळ्यात स्वयंपाक करणे, तोंडात जाणाऱ्या अन्नपाण्याची काळजी घेणे, हे त्यासाठीच.. पूर्वजांनी रुढीपरंपरेत दडवलेले विज्ञान आता ह्याला स्पष्ट दिसू लागले होते. मागास समजल्या गेलेल्या ह्या गोष्टी आताच्या परिस्थितीतही किती उपयोगी आहेत ह्याची जाणीव झाली होती. सुखी, सुदृढ जीवनाचा चिरंतन मंत्र सनातन धर्मात कसा दडला आहे, ह्याचा त्याला अभिमान वाटला. इतके दिवस ह्या गोष्टींच्या फायद्यांपासून दूर राहिल्याने स्वतःची लाजही वाटली. मनात विचार येऊन गेला की जर थोडीफार दक्षता जीवनात आधी बाळगली असती तर सर्दी, खोकला, ताप वा जुलाबासारख्या रोगांपासूनदेखील किती सुरक्षितता मिळाली असती?

आजी, आजोबांच्या निरोगी आयुष्याचा गुरुमंत्र आज त्याला उमगला होता.

© Sanjeev Dahiwadkar

संजीव दहिवदकर: 

Comments