उद्यान विहार

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ।।

बालकवींच्या या ओळी आठवल्या की श्रावणाचं चित्र डोळ्यांपुढे तरळून जातं. मेरीलँडचं वातावरणही काहीसं असंच. ह्या इथल्या वातावरणाचं वर्णन करायला बालकवींच्या वरील ओळी अगदी समर्पक ठरतात. निसर्ग हा नेहमीच माणसाला प्रसन्न आणि आल्हाददायक वाटतो. थोर शास्त्रज्ञ न्यूटन म्हणतात की "Nature is pleased with simplicity. And nature is no dummy." झाडे, फळे, फुले, पाने,नद्या, डोंगर असाच निखळ आनंद देत राहतात. रेमरॅंडच्या म्हणण्यानुसार "Choose only one master - Nature." म्हणजेच निसर्ग हा माणसाला शिकवतो. तोच माणसाचा गुरु असतो.

मी मूळची तळेगाव दाभाडेची. (मुंबई - पुणे हायवेवरील तळेगाव) आणि केदार नाशिकचा. त्यामुळे निसर्गरम्य ठिकाणांहून आलेल्या आम्हा दोघांना निसर्गाच्या कुशीची मनात ओढ होतीच. मुळातच तळेगाव दाभाडे आणि नाशिक, दोन्हीही थंड हवामान आणि निरोगी वातावरणासाठी प्रसिद्ध. तळेगाव तर मुंबईच्या लोकांसाठी सेकंड होम. हिरवळ आणि भरपूर झाडे, डोंगर, नद्या, यांनी नटलेलं असं तळेगाव. लहानपणापासूनच घरी मोठी बाग- त्या बागेत विविध फुलझाडं आणि फळझाडं होती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीही सुस्वरें आळविती ।। या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय प्रतिदिनी मिळायचा.

मी अमेरिकेत आले २३ जानेवारी २०२० ला. इथेही ईस्ट कोस्ट असाच निसर्गरम्य आणि हिरवागार वाटला. मुळातच निसर्गाची ओढ असल्यामुळे हाही निसर्ग आम्हाला खुणावत होता आणि त्याचमुळे आम्हाला निसर्गाची, बागेची ओढ वाटू लागली. सुरुवातीचे काही दिवस फिरलो. पण मग नंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाले आणि प्रत्येक व्यक्ती घरात जेरबंद झाली. वेळ घालवण्यासाठी आपापले छंद प्रत्येक जण जोपासायला लागला. तंत्रज्ञानाच्या मागे धावणारा प्रत्येक जीव निसर्ग आणि आपल्या कुटुंबाच्या जवळ आला. किंबहुना तो जवळ होताच पण आता तो वेळ देऊ शकला.

याच काळात मी आणि केदारने मिळून बाग करायचे असे ठरवले. मग बागेत कोणती झाडं लावायची, कोणती झाडं लावायची नाहीत अशी चर्चा करायचो. रोज वेगवेगळ्या नर्सरीत किंवा गार्डन सेन्टरमध्ये जाणं (तेही चेहऱ्याला मास्क लावून आणि हातात ग्लोव्हस घालून), तिथली वेगवेगळी रोपं, फुलझाडं बघणं, ती खरेदी करणं हा उद्योगच सुरु झाला. काही वेळा आम्ही लगेच झाडं घ्यायचो, काही वेळा तिथल्या तिथे नेट सर्फिंग करून किंवा घरी थोडी माहिती मिळवून दुसऱ्या दिवशी किंवा त्या वीकेंडला झाडं खरेदी करायचो. नर्सरी किंवा गार्डन सेन्टरमध्ये जाणे हा आमचा नित्यक्रमच झाला होता जणू. पण यात वेळ खूप छान जायचा. घरी आल्यावरही आम्ही त्याचीच चर्चा करायचो. "चाय पे चर्चा, खाने पे चर्चा" असं. यात माझे सासरे जे पेशाने इंजिनिअर आहेत, पण त्यांनी नाशिकला अप्रतिम टेरेस गार्डन करून सगळ्या भाज्या आणि फळे लावली आहेत, त्यांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं आणि महत्त्वपूर्ण ठरलं. झाडं आणली मग त्यांच्यासाठी कुंड्या हव्यात. त्या सुंदर झाडांना साजेल अशा सुंदर कुंड्या हव्यातच. मग त्यांचा शोध सुरु झाला. झाडं लावणार असल्यामुळे जागेची मर्यादा होती. त्यामुळे काही वेळा मनाला मुरडही घालावी लागली. फक्त नेत्रसुखावर समाधान मानावं लागलं. कुंड्या आल्या. मग आपण आणलेली सर्व झाडं आता रुजवायची. त्यासाठी माती हवी. मग मातीसाठीही शोध सुरु झाला. कोणत्या झाडांसाठी कोणती माती लागेल ते बघितलं. भारतात आपण सरसकट माती वापरून वेगवेगळी खत वापरतो पण इथे थोडं वेगळंच. झाडांनुसार ‘पॉटिंग मिक्स’ बदलतं हा एक नवीनच अनुभव आम्हा दोघांसाठी. मग त्यातल्या त्यात जास्तीत जास्त झाडांसाठी सामायिक असेल असं पॉटिंग मिक्स निवडलं आणि पोतीपोती माती घरी आणली.

मग एका वीकेंडला वृक्षारोपणाचा कार्यक्रमच आयोजित केला आम्ही दोघांनी. (कारण लॉकडाऊनमध्येही हेल्थकेअर प्रोफेशनल असल्यामुळे केदारला वीकडेजला ऑफिस होतंच). सकाळचा चहा घेऊन वृक्षरोपणाला लागलो. विज्ञानाने प्रगती केली आहे त्यामुळे मार्गदर्शनासाठी सासू-सासऱ्यांना व्हिडिओ कॉलवर ऑनलाईन ठेवून झाडं लावण्याचा श्रीगणेशा केला. कुंड्यांना खाली बिळे पाडून त्यात माती घालून एकेक झाड लावत गेलो. अर्ध्यावर रोप लावले मग त्याच्यावर परत वरती माती घातली व वरून थोडेसे पाणी घालून कुंडी सूर्यप्रकाशात ठेवली. अशा पद्धतीने एक-एक करत सर्व झाडं शनिवार - रविवार मिळून लावली.

लावलेल्या रोपट्याचं झाडात रूपांतर होण्यासाठी ते रुजणं महत्वाचं. जशी एखादी मुलगी माहेराहून सासरी येते, रुजते आणि सासरचं अंगणच तिचं होतं तशी ही झाडं वेगवेगळया माहेराहून आली होती आणि रुजायला अनुकूल होती. प्रत्येकाचा वर्ग वनस्पती हाच असला तरी कुळ, पोटजात वेगवेगळी. प्रत्येकाच्या आवश्यकता, ऊन - पाण्याच्या गरजा वेगवेगळ्या. पण तरीही त्या सगळ्या झाडांना आपलंसं वाटणारं अनुकूल वातावरण देणं हे आमचं कर्तव्य होतं. यासाठी धाकधूक होती मनात. कारण इथल्या वातावरणाची, त्याचाशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये तयार व्हावी. त्यासाठी रोज त्यांना पाणी घालणं, पुरेसं ऊन मिळू देणं, इत्यादींची दक्षता घेतली. झाडांना रोज ऊन आणि पाणी मिळालं की ती छान जोमाने वाढतात. मधून-मधून पोषक खतं घालायची. पण आम्ही झाडं नुकतीच लावलेली असल्याने खतांची लगेच आवश्यकता नव्हती (पॉटिंग मिक्स मध्ये खते मिसळलेली असतातच). साधारण सहा महिन्यांनंतर त्यांना खते लागतील. आपली बाग कशी तयार होते याची उत्सुकता दिवसागणिक वाढत होती. संयम ठेवून आम्ही रोजच्या रोज बागेतली झाडं न्याहाळत होतो. असे करत करत कुंड्या खरेदी केल्या. कुंड्या आणायला गेलो की एखादं वेगळंच झाड आवडायचं, मग ते घ्या असं व्हायचं. पण आम्ही बाल्कनीमध्ये साधारण महिन्याभरानंतर झाडांनी जसं एखादं बाळ बाळसं धरतं तसं बाळसं धरलं आणि बाग छान बहरू लागली. फुलझाडांना विविधरंगी फुले आली, नुसती पानं असणारी झाडं विस्तारली आणि एक सुंदर चित्रंच साकारलं जणू. आताही आमची झाडं छान वाढत आहेत. झाडांच्या बाजूला आम्ही पक्ष्यांसाठी दाणे आणि पाणी ठेवतो. त्यावर वेगवेगळे पक्षी येतात आणि मस्त चिवचिवाट करतात. हा अनुभव काही न्याराच! निसर्गाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे नेणारा अवर्णनीय आनंद! चित्रकाराने हातात कुंचला घ्यावा आणि आपल्या मनाप्रमाणे चित्र रेखाटावे असंच काहीसं आमचं बागेबाबतीत झालं आहे. मनाप्रमाणे बाग करतो, ती सजवतो. बाग हा आता आमचा कॅनव्हास आणि आम्ही तिचे चित्रकार. कल्पनासुद्धा मन मोहवून टाकते.

या बागेचे नित्य नवे रूप मनमोहक असतेच. रोजच ते आपल्याला कॅमेऱ्यात टिपावेसे वाटते. याठिकाणी बाग आम्हाला फोटोग्राफरच्या भूमिकेत घेऊन जाते. ‘निसर्ग नित्यनूतन असतो’ याचा प्रत्यय आपल्याला क्षणाक्षणाला, तासागणिक आणि दिवसागणिक येत असतो. सकाळची कळी अर्ध्या तासात उमललेली असते. कळीचं फूल झालेलं असतं. बोटभर दिसणारं झाड आठवड्यात हातभर होतं आणि मग आपण त्या विश्वनिर्मात्याचं आणि त्याने निर्माण केलेल्या सृष्टीचं कौतुक करतो, मनोमन कृतज्ञता व्यक्त करतो. निसर्गाची किमया टिपण्यासाठी आम्ही ठराविक काळाच्या अंतराने फोटो आणि व्हिडिओज करत आहोत. त्यात माहिती देत आहोत. हे करणंही खूप गंमतीशीर आहे. सुरुवातीला तर अगदी काहीही तयारी न करता केलेला व्हिडिओ होता. पण त्याचही सौंदर्य काही निराळंच. पुढचा व्हिडिओत त्याच्या पुढे जाऊन बाळसं धरलेली झाडं होती. आता काही दिवसांनंतर आणखी एक पाऊल पुढे वाटचालीचं. अशी ही बाग आम्ही फुलवली. आपणांपैकीही कोणाला आवड असल्यास नक्की बाग करा. त्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

सगळ्यांना माहितीपर किंवा मार्गदर्शनपर म्हणून माझ्या बागेत असलेल्या झाडांची माहिती देते. माझ्या बागेत कोणकोणती झाडं आहेत ते बघूया :

१) जर्बेरा : जर्बेरा म्हटलं की फुलांचा गुच्छ डोळ्यांपुढे उभा राहतो. तसं हे मूळचं आफ्रिकेतलं रानफूल. पण आता जगभर पसरलंय. अतिशय मनमोहक रंग आणि आकार यामुळे हे फूल सगळ्यांनाच आवडतं. या फुलाचं नाव जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. जर्बर यांच्या नावावरून ठेवलं गेलं. जर्बेराकडे फुलपाखरे, पक्षी आकर्षित होतात, मात्र हरणे दूर जातात. माझ्याकडे एकाच झाडाला दोन रंगाची फुले आली होती जर्बेराला. ही एक गंमतच. यात आपल्याला निसर्गाचे दर्शन घडते. जर्बेराचे झाड हे घरात किंवा घराबाहेर कुठेही ठेवता येते.

२) डेलिया - मध्य अमेरिका आणि मेक्सिकोत मूळ असलेल्या डेलियातही खूप रंग आढळतात. याच्या जवळपास ४२ प्रजाती आहेत. या फुलांना सुगंध नसतो. ही झाडं १ ते ८ फूट वाढतात. त्यामुळे अंगणात लावली जातात. डेलिया हे १९६३ पासून मेक्सिकोचं राष्ट्रीय फूल आहे. आमच्या बागेत पिवळा, लाल आणि जांभळा असे तीन डेलिया आहेत.

३) जास्वंद - जास्वंद म्हटलं की आपोआप गणपती बाप्पा डोळ्यांपुढे येतात. ही जास्वंदीची झाडं उबदार हवामान असणाऱ्या प्रदेशात आढळतात. अतिशय सुंदर असे गुलाबीसर रंगाचे जास्वंद या आमच्या बागेत आहे. रंगरूपासाठी आवडत असलं तरी जास्वंदीचा उपयोग म्हणजे यात 'क' जीवनसत्व (vitamin C) मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणूनच जास्वंदाचा चहा (Hibiscus tea) जगभर प्यायला जातो.

४) मोगरा - बागेतला मोगरा बघून " मोगरा फुलला " हे गाणं आठवणार नाही असा मराठी माणूस सापडणार नाही. मोगऱ्याच्या सुगंधानेच आसमंत दरवळून जातो. याच्या जवळपास २०० प्रजाती आहेत. सदाहरित मोगरा सगळ्यांचेच मन आनंदित करतो. अत्तरे आणि सुगंधी द्रव्यं तयार करण्यासाठी मोगऱ्याचा उपयोग केला जातो. मोगऱ्याचे झाड घरात किंवा घराबाहेर कुठेही ठेवू शकतो.

५) गुलाब - आमच्या बागेतला गुलाबी रंगाचा भरपूर फुले येणारा गुलाब बघून दिवाळीतल्या फटाक्यातल्या पावसाची आठवण होते. जणू काही गुलाबाची फुले म्हणजेच फटाके. दुसरा गुलाब आहे तो पिवळा गुलाब. हा त्याच्या कुटुंबातला एकमेव सुगंधी गुलाब आहे. या पिवळ्या गुलाबाचा आणि मोगऱ्याचा मिश्र सुगंध वाऱ्याची झुळूक घेऊन येते, आपल्याला प्रफुल्लित, ताजेतवाने करते. आणखी एक गुलाब आहे तो एब टाईड फ्लोरिबंडा. हा जांभळ्या रंगाचा गुलाब असून याला थोडा लवंगांसारखा सुगंध येतो. गुलाबाचे झाड शोसाठी म्हणूनही ठेवतात. अत्तरे, खाद्यपदार्थ, पेय, सूप, चहा अशा गोष्टींमध्ये गुलाबाचा वापर होतो. गुलाबातही मोठ्या प्रमाणात 'क' जीवनसत्व असते.

६) गवती चहा - गवती चहा मूळचा आशिया आणि आफ्रिका खंडांच्या भागातला. याला आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. गवती चहा स्वयंपाक आणि त्यापासून तेल काढण्यासाठी वापरतात. गवती चहा घराबाहेर ऊन मिळेल अशा ठिकाणी लावतात.

७) झेंडू - भारतीय संस्कृतीत झेंडूला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. कोणतेही सणसमारंभ असले, की दाराला झेंडूची फुलं आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. देवपूजेतही झेंडूची फुलं वापरली जातात. जगभर सर्वत्र झेंडूची फुलं मिळतात पण याचे मूळ दक्षिण मेक्सिकोत आहे. आमच्या बागेत आफ्रिकन मेरीगोल्ड आणि युरोपिअन फ्रेंच मेरीगोल्ड असे दोन झेंडू आहेत. आफ्रिकन झेंडूला पिवळी, मोठी, टपोरी फुलं येतात, तर फ्रेंच झेंडूला नाजूक केशरी रंगाची फुलं येतात. झेंडूमुळे कीटक, कीडे यांना प्रतिबंध होतो. तसेच झेंडू लावल्यामुळे हरणे, डुकरे येत नाहीत. झेंडूचाही उपयोग अत्तरे, तेल बनवण्यासाठी होतो. तसेच जमिनीची प्रतवारी सुधारण्यासाठीसुद्धा झेंडूची झाडं लावली जातात. युरोपिअन युनियनमध्ये झेंडूच्या फुलांचा उपयोग खाद्य पदार्थांच्या रंगांसाठी (उदा. पास्ता, वनस्पती तेल, सॅलड ड्रेसिंग, आईस्क्रीम इ.) करतात. झेंडू हा घरात किंवा घराबाहेर कुठेही लावू शकतो.

८) लिली - लिली हे एक कंद लावून येणारे फुलझाड आहे. उत्तर गोलार्धात या प्रजातीचे मूळ आहे. मोठी, सुगंधी, रंगीबेरंगी (पांढरी, पिवळी, केशरी, गुलाबी, लाल, जांभळी) फुले येतात पण वर्षातून एकदाच येतात. तीही वसंत ऋतूच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला. या झाडांना वरती ऊन पण मुळांशी सावली आवश्यक आहे. लिलीचे कंद पिष्टमय असल्यामुळे चीन, तैवान, जपान इत्यादी देशांत ते कंद नुसतेच किंवा सूप किंवा प्युरी करण्यासाठी वापरतात. लिली हे तुमच्या आप्तेष्टांसाठीचे प्रेम, जिव्हाळा यांचे प्रतीक आहे. तर केशरी लिली हे आनंद, प्रेम, जिव्हाळा यांचे प्रतीक आहे. आमच्या बागेत पिवळी व केशरी अशा दोन लिली आहेत.

९) पोलका डॉट प्लांट (फक्त गुलाबी पाने असलेलं झाड) - मुळात हे झाड दक्षिण आफ्रिका, मादागास्कर आणि आग्नेय आशियात सापडते. हे झाड साधारण एका फुटापर्यंत उंच आणि तेवढंच रुंदही होतं. कधीकधी याला गुलाबी किंवा जांभळी फुले येतात. हे झाड घरात लावण्याचे आहे पण ते बाहेरही वाढवू शकतो.

१०) जिरॅनिअम (फिकट गुलाबी रंगाचे फुलांचे झुबके असलेलं झाड) - जिरॅनिअमच्या ४२२ प्रजाती असून याला वर्षभर फुलं येतात. गार्डनसाठी हे एक प्रसिद्ध बेडींग प्लांट आहे. पण ते साधारण घरात किंवा घराबाहेरही बास्केटमध्ये अडकवले जातात. यालाही पांढरी, गुलाबी, जांभळी, निळी अशी वेगवेगळी रंगीत फुले येतात. ही थंडीलाही न जुमानणारी वनस्पती आहे.

११) वॅक्स बिगोनिआ (गडद गुलाबी रंगाची फुले आणि हिरवीगार पाने असलेले झाड) - या वनस्पतीचं नाव शोधताशोधता माझी पुरेवाट झाली. नर्सरीतून आणताना वर्षभर फुलं येणाऱ्या झाडांच्या विभागातून हे आणले. नाव माहितीच नव्हते. आणि मग ते नाव सापडल्यावर युरेका म्हणण्याचा आनंद झाला अगदी मला. याच्या १८०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. हेही मूळचे विषुववृत्तीय आणि समशीतोष्ण कटिबंधातील झाड आहे. थंड हवामानाच्या प्रदेशात हे झाड घरात शोसाठी ठेवले जाते. थंडीच्या दिवसात ही झाडं उन्हात ठेवली जातात मग त्यांना गडद रंगाची फुले येतात. यांना पांढरी, गुलाबी, तपकिरी, पिवळी,अशी विविधरंगी फुले येतात.

सध्या एवढी झाडं बागेत आहेत. आणखी नवीन झाडं लावली, वाढली, की, नक्कीच सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवीन. धन्यवाद !

पूनम दिघे-सुळे:

Comments