मी पाहिलेला हिमालय

श्रीमती चित्रा धाकड

“हिमालयावरूनी वाहत असे ती धन्या, 
म्हणे ही आल्यावरती पुरती हिमाद्री कन्या ||
बाजूला खडक असोनी उंच भारी,
 वाहे त्यामधुनी ती देवी शुद्ध नारी ||”

इ.स.१९७० च्या दशकात माझे आजोबा या पंक्ती गुणगुणत असत व मला ते खूप आवडायचे. आजोबा मुख्याध्यापक असल्याचा आम्हाला अभिमान होता. मी तेव्हा ८-९ वर्षांची असेन, माझा हात धरून शाळेत नेणे व ऊन लागू नये म्हणून डोक्यावर छत्री धरणे अशी खूप काळजी ते घ्यायचे. अशा आजोबांची नात आजोबांचा वारसा का म्हणून नाही पुढे नेणार? त्यांच्यामुळेच ही प्रेरणा मला मिळत आहे. लेखणी जरी माझ्या हातात असली तरी विचार त्यांचे आहेत. त्यांच्या विचारांशिवाय माझे लेखन निरस वाटेल, लेखनाला ओलावाच राहणार नाही. त्यांच्या विचाराने मला स्फूर्ती येते. माझ्या नकळत जे विचार डोक्यात येतात, ते या लेखणीद्वारे प्रकट होतात अशा आजोबांना मी नमस्कार करते व असेच प्रेमळ आजी-आजोबा सगळ्यांना लाभो हीच प्रार्थना देवाला करते. 

मी भाग्यवान आहे कारण सानेगुरूजींची कर्मभूमी असलेल्या अंमळनेर तालुक्यात मी जन्मले व लहानाची मोठी झाले, शिक्षण घेतले. तिथल्या प्रत्येक गोष्टींना विचारांचा, प्रेमाचा सुगंध आहे. गुरुजींच्या पदस्पर्शाने ती भूमी पवित्र झाली आहे. त्या विचारावर पाऊल ठेवून मी आज जगत आहे. लहानपणी त्यांना मातृसुख जास्त काळ लाभले नाही तरी ते आज जगाची आई बनले. पुष्कळ कवी, लेखक यांनी लिखाण केले पण साने गुरुजींची पुस्तके वाचून, कविता ऐकून दगडाला पण पाझर फुटतो व डोळ्यांत  नकळतपणे पाणी येते.

माझे वडील हिंदुस्थान लिमिटेड कंपनीमध्ये स्टोरकिपर असल्याने त्यांच्या कुठेही बदल्या व्हायच्या. आम्ही आजी-आजोबांजवळ राहायचो.वडील १९६८ मध्ये डेहराडूनला होते. डेहराडून हे लष्करी प्रशिक्षणाचे केंद्र आहे. तिथला बासमती तांदूळ प्रसिद्ध आहे.मी उन्हाळी सुट्टीत  एकदा चौथीत व एकदा सातवीत असताना तेथे गेल्याचे चांगलेच आठवते.रेल्वेस्टेशनजवळच आमचे घर होते.दारावरून ट्रेन जायची.त्याकाळी अंमळनेर ते डेहराडून हा  रेल्वेचा प्रवास ३-४ दिवसांचा होता. प्रवासात खूप मजा असायची. बालपणच होते ते! डेहराडूनमध्ये चोरपूर तालुक्यात खादर, अस्नोक व आमचे शेवटचे टोक "कोटी" हे गाव होते. गाव म्हणजे ३०-३५ लोकांची धरण बांधकामासाठी केलेली ती तात्पुरती सोय होती. पक्की घरे, एक छोटे किराणा दुकान, एक दवाखाना होता. सर्व क्लर्क व साहेब यांची घरे होती. डेहराडून ते कोटी पहाडाचा  नागमोडी रस्ता  ३-४ तासांचा होता.हिमालय पर्वत वडिलांमुळे पाहायला मिळाला.

अशा या हिमालय पर्वतावर राहणे सोपे नव्हते.रस्ते नागमोडी वळण घेणारे होते.आम्ही सहज पायी फिरत जवळच जात असू  पण ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्या एखाद्याला तिथे सहज चक्कर आली असती . जिकडे तिकडे बर्फाने आच्छादलेल्या टेकड्या होत्या. पहाडाचे टोक गगनाला भिडले आहे असे वाटायचे.बर्फ पडल्यावर पहाड व आकाश एकच झाल्याप्रमाणे वाटायचे  .धुके राहायचे.बर्फ वितळल्यावर पहाड दिसायचा. एकीकडे उंचच उंच पहाड व एकीकडे खूप खोल दरी व त्यात खळखळ आवाज करीत वाहणारी नदी! रस्ता इतका कमी रुंदीचा होता की एकेकडची गाडी गेल्याशिवाय पलीकडच्या गाड्या येऊ शकत नसत. उंच पहाडावरून दरड केव्हा कोसळेल सांगता येत नसे .

पावसात बर्फ, माती, दगड खाली येत असे व रस्ता रोखून धरत असे. तिथले कुली (हमाल) तो ढीग पावडीने नदीत फेकायचे, तेव्हा पायवाट मोकळी व्हायची व आम्हाला ते कुली प्रत्येकाचा हात धरून सावकाश दुसऱ्या टोकाला न्यायचे. त्यांना पहाडांवरती चढउतार करायची सवय होती.सुट्टी  संपल्यावर परत गावाला येताना  भरपावसात आम्हाला  प्रवास करावा लागला तेव्हाचा  प्रसंग आठवला की अजूनही अंगावर शहारे येतात! जराही तोल गेला तर समजावे,आता जलसमाधी मिळणार व साक्षात मृत्यच समोर उभा राहणार. आठवले की अजूनही अंगावर काटा येतो!

हिमालय भारताचा मुकुट आहे, मानबिंदू आहे. डेहराडूनहून परत येताना आम्ही हरिद्वारला गंगा नदीत स्नान करायचो. जी गंगामाई सगळ्यांचे पाप धुवून काढते, ज्या गंगेचे जल आपण तीर्थ म्हणून घरात ठेवतो अशा गंगेत स्नान करायला मला मिळायचे म्हणून मी स्वतःला खरेच खूप भाग्यवान समजते. हिमालयात उगम पावणारी गंगा म्हणजे उंचावरून वाहणारा धबधबा! धों-धों असा आवाज करत खाली येतो क्षणात! विश्वास बसत नाही या डोळ्यांवर! या सृष्टीचा कलाकार किती महान असेल! माझी भारतभूमी किती पवित्र आहे, सुख-समृद्धीने भरलेली आहे, सुजलाम सुफलाम आहे! संत, ऋषी, मुनी या मातीत जन्मले. भगवान श्रीकृष्णाने या भूमीवर अवतार घेऊन कुरुक्षेत्रावर स्वमुखाने 'श्रीमद्भगवद्गीता' गायली आहे व तो विश्वाचा ग्रंथ आहे. विश्वातील संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करणारे  रामायण, महाभारत या भूमीत घडले हे साऱ्या जगाला माहीत आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, ‘दुर्लभम् भारत जन्म!’ त्या भारतात माझा महाराष्ट्र देश आहे. तेव्हा मी लहान असल्यामुळे बद्रीनाथ व केदारनाथ पहिले नव्हते, पण, हिमालय व ते दृश्य डोळ्यांत पूर्ण साठवून घेतले. मेंदूच्या कॉम्प्युटरमध्ये विचार जतन करून ठेवले. तेव्हा कॅमेरा, मोबाईल ही साधने नव्हती.

वडिलांनी आमचे खूप लाड व कौतुक केले. धरणबांधकाम नदीकिनारी होते. तिथे एक ऑफिस होते. कंपनीची गाडी ने-आण करायची.३-४ खेडी मिळून एक शाळा तालुक्याच्या गावी होती. समोरासमोर विशाल पहाडांचे दर्शन होई. एका ठिकाणी उंचावर पर्यटनस्थळ होते. तिथे दुरून सर्व गंमत दिसे व नट-नट्या शूटिंगसाठी यायचे. पहाडी लोक तिथेच तंबू करून राहात. तंबूला खिडकीच्या आकाराचे लहान दरवाजे असत. थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून वाकून दरवाजातून जावे लागे. प्रेमळ व कष्टाळू लोक होते ते.आम्ही तरी पक्क्या सिमेंटच्या घरात राहायचो. विजेची शेगडी, हीटर, सर्व साधने होती. त्या लोकांच्या घरात साधा दिवा मिणमिणताना दिसायचा.

कंपनीच्या ठिकाणी सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आपला परिवार समजून गुण्यागोविंदाने राहात. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत. जवळच क्लबमध्ये दर रविवारी पार्टी व्हायची. प्रत्येक ताई कोणता पदार्थ  करायचा ते वाटून घ्यायची.१००-१५० लोक जेवायचे.खेळ खेळायचे. कधी रात्री पडद्यावर एखादा चित्रपट दाखवायचे.आम्ही तारेने गावाला माहिती देत होतो.माझी आई ज्या ताईंकडे शिकायची तिच्या हाताची चव वेगळीच होती.साक्षात अन्नपूर्णाच होती ती!सर्वांशी ओळख करून घ्यायची, जीव लावायची, आईशिवाय त्या ताईंनापण  करमत नसे .आम्हाला रोज बासमती तांदुळाचा भात, खिचडी, इडली असे पदार्थ करून खाऊ घालायची. आम्हा सर्व बहिणींना आईने स्वेटर, टोपी, मफलर विणले होते.अशी आई सगळ्यांना मिळो, हीच देवाजवळ मी प्रार्थना करते.

आपण सगळ्यांनी एकदा तरी या हिमालयाचे दर्शन करावे असे वाटते.तुटके-मुटके शब्द वापरून मी हा लेख लिहिला आहे मी काही लेखिका नाही पण तरी माझे मनोगत मला व्यक्त करायला संधी मिळाली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

"सूर्यप्रकाश संपल्यावर संधिप्रकाश मागे असतो, सहवास संपल्यावर 'स्मृती' जागी असते!"

 

Comments