अमेरिकन व्हिसाचे अनुभव

डॉ. गजानन सबनीस

सध्याच्या काळात अमेरिकेत राहाण्यासाठी लागणारे ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी खटपटी लटपटी पुष्कळच चालू आहेत. मग काही जण नाते दाखवून/शोधून व्हिसा मिळवण्याच्या मागे असतात, तर काही अमेरिकन नागरिकाशी लग्न करून. हा प्रयत्न काही नवीन नाही, कारण गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यावेळेस भारतीय समाज आणि त्यातून मराठी समाज खूपच लहान होता त्यामुळे व्हिसा प्रकरण पटकन संपूनपण जायचे. अमेरिकन व्हिसाबद्दलचा इतिहास पुष्कळांना माहीत व्हावा म्हणून आणि व्हिसा प्रक्रियेतून गेलेल्या आमच्यासारख्या इतर लोकांच्या आठवणींना उजाळा द्यावा म्हणून हा लेख लिहिण्याचा उहापोह केला आहे.

अमेरिकन व्हिसाबद्दल लिहायचे तर पुष्कळच लिहिता येण्यासारखे आहे. प्रत्येकाचा अनुभव त्या त्या परीने वेगळा आहे. असे अनुभव आणि विचार लिहून काढले तर एक छानशी मालिका तयार होईल आणि हे अनुभव वाचून वाचकांना पण त्याबद्दल पुष्कळ माहिती मिळेल असा एक विचार डोक्यात आला. हा विचार जवळच्या मित्रमंडळींकडे मांडला त्यांनापण आवडला. तेव्हा आम्ही असे ठरवले की मी माझा अनुभव थोडक्यात सांगून सुरुवात करावी आणि पुढच्या तीन-चार अंकांमध्ये इतरांकडून त्यांचे अनुभव लिहिण्याचे आवाहन करावे म्हणजे वाचताना पण सलगता येईल. सुरुवात मी स्वतः १९६० च्या दशकात अमेरिकेत आलो तेंव्हापासून करत आहे. आमच्यासारखी इतरही मंडळी १९६० ते १९७० पर्यंत प्रथम शिक्षणानिमित्त आली. पुढे अमेरिकेत राहण्यासाठी ग्रीनकार्ड नुसते अमेरिकेत येणाऱ्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा मिळते हा नवीन उपक्रम सुरु झाल्याने १९७०-७५ मध्ये भारतात नोकरी वगैरे असूनसुद्धा पुष्कळशी मंडळी तिकडची नोकरी सोडून त्यांच्या १-२ मुलाबाळांसह अमेरिकेत आली. काही स्वतः पुढे आले आणि स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी इतर कुटुंबीयांनापण आणले. थोडक्यात ही मंडळी येथे येऊन नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाली. त्यानंतर म्हणजे १९७५ ते ८० मध्ये ह्याच मंडळींचा अमेरिकेतल्या मातीत जम बसला आणि ही मंडळी त्यांच्या भावाबहिणींना पण आणायच्या मागे लागली. थोडक्यात मराठी वृक्ष आमच्या १९६० ते ७० च्या सुरुवातीच्या स्थित्यंतरानंतर खूपच वाढला. तेव्हा हा अनुभव खूप मार्गदर्शक किंवा महत्त्वाचा ठरावा. 


मी १९६१  साली VJTI या मुंबई'च्या त्यावेळेच्या एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज मधून BE करून बाहेर पडलो त्यावेळेस पुढे M.Tech किंवा PhD करण्याचा उद्देशपण नव्हता. कारण आमची BE परीक्षा आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती की नोकरी ताबडतोब मिळायची. त्यावेळेस मी फक्त वीस वर्षाचा होतो. BE परीक्षेमध्ये पहिला येऊन सुवर्णपदक मिळवल्यानंतर वडिलांनी M.Tech करायला लावले. त्यामुळे नोकरी न करता M.Tech साठी मुंबईच्या नवीन IIT मध्ये प्रवेश घेतला.  अर्थात त्यावेळी मुंबईची IIT ही भारतातली पहिलीच असल्याने त्यातले आम्ही नऊ Civil Engineering चे विद्यार्थी भारताच्या सर्व कोपऱ्यांतून आलो होतो.  त्यात मुंबई विद्यापीठाचा  मी एकटाच.  इतर विद्यार्थी पुणे, बडोदा, मद्रास, खरगपूर अशा ठिकाणांहून आले होते. त्यात पाचजण अनुभवी होते आणि इतर चारजण माझ्यासारखे  नवीन, BE  नंतर सरळ M.Tech ला दाखल झालेले. आमचे प्राध्यापक सर्व प्रकारचे होते. त्यात एक रशियन प्रोफेसरपण होते.  हे सर्व करून १९६३ मार्चमध्ये M.Tech डिग्रीही पदरात पडली तेव्हा नोकरी करायला हरकत नव्हती. परंतु नोकरी शोधताना लक्षात आले की M.Tech केल्यामुळे ठराविक पद्धतीचीच नोकरी शक्य होती. शेवटी इंडियन ऑईल ह्या कंपनीत नोकरी करायचे ठरवले. तिथे काम टेक्निकल असे नव्हतेच, पण त्या नोकरीच्या निमित्ताने एक ओळख निघून Cornell विद्यापीठात PhD करण्याची (शिष्यवृत्तीसकट) संधी मिळाली म्हणून अमेरिकेत यायचे ठरवले. व्हिसासाठी लागणारी सर्व कागदपत्रे बरोबर असल्याने विद्यार्थ्यांसाठी असणारा  F-1 व्हिसा मिळायला फार त्रास झाला नाही. त्यावेळेस शिक्षणासाठीचा F-1 व्हिसा मिळवणे सोपे होते व त्यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय दाखले. पहिला दाखला म्हणजे X-ray आणि दुसरा blood-work चा दाखला. वैद्यकीय दाखले लागण्याचे मुख्य कारण म्हणजे तुम्हाला TB आहे का ते तपासणे, कारण तो रोग  अमेरिकेत येऊ न देणे हा उद्देश. वैद्यकीय तपासण्यासुद्धा फक्त ठराविक लॅबोरेटरीमध्येच करणे गरजेचे असायचे. दोन-तीन लॅब्सनी American Consulate शी संधान बांधून ठेवलेले होते. ह्या दोन्ही गोष्टी आणि इतर शैक्षणिक गोष्टी असल्या की व्हिसा मिळाल्यातच जमा असे. ह्या महत्वाच्या गोष्टी  पूर्ण केल्यानंतर माझा व्हिसा एकदाचा हातात पडला.  

अमेरिकेत फक्त तीन वर्षे राहायचे, PhD करून परत येऊन भारतात राहायचे एवढाच त्यावेळचा उद्देश. कारण घरातला मी सगळ्यात मोठा मुलगा होतो आणि इतर भाऊ शिकत होते. शिवाय वडीलही १९६६ साली निवृत्त होणार होते. त्यावेळेस इतर वेगळ्या पद्धतीचे व्हिसा असतात याची माहितीपण नव्हती, आणि माहिती असण्याची गरजपण नव्हती. एकदा PhD संपवून भारतात गेल्यावर अमेरिकेला परत यायचे ही कल्पनापण मनात नव्हती.

१९६७ साली  PhD पूर्ण करून ऑगस्टमध्ये भारतात पोहोचलो त्यावेळेस मला दोन वर्षांसाठी US Governmentची Grant पण मिळाली होती. ती Grant बरोबर असल्यामुळे माझ्या नोकरीची ताबडतोब सर्व व्यवस्था होईल अशी आशा  होती. मात्र नियतीची वेगळीच इच्छा होती. काहीतरी किरकोळ कारण काढून ते पैसे मला वापरता येणार नाहीत असे मला मुंबईमध्ये मुख्याध्यापकांनी सांगितले आणि मग मात्र माझे धाबे दणाणले. PhD नंतर नोकरी मिळवणे सोपे नव्हते.  अमेरिकेतील   माझ्या तीन वर्षांच्या वास्तव्यात झालेल्या मित्रांच्या ओळखीने अमेरिकेत परत येण्याची संधी मिळाली.  पण व्हिसाचे काय करायचे?  तोपर्यंत आणखी मिळालेली माहिती म्हणजे नोकरीसाठी J-1 व्हिसा मिळतो. पण तो घेतला तर तीन वर्षानंतर परत भारतात किंवा अमेरिकेच्या बाहेर इतर कुठेतरी जाऊन ग्रीनकार्ड घ्यायला लागते. अशा चक्रातून जाण्याची त्यावेळेस माझी तयारी आणि इच्छापण नव्हती. एकदा अमेरिकेला गेल्यावर आठ-दहा वर्षे राहायचे आणि परत यायचे नाव काढायचे नाही या विचाराने मला जायचे  होते. भारतात व्हिसाची सर्वात जास्त माहिती ट्रॅव्हल एजंट्सना असते, कारण त्यांचा हेतू प्रवाशांना मदत करण्याचा  असतो.  US Consulate  मध्ये नेहमी जाणे असल्याने माझ्या एजंटने मला B-1 व्हिसाबद्दल सांगितले, पण  तो व्हिसा फक्त अमेरिकेतच स्पॉन्सर करून मिळतो. त्यामुळे ताबडतोब जेथे नोकरी होती तेथे फिलाडेल्फिया मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियामधील प्रोफेसरने स्वतः इमिग्रेशन ऑफिसमध्ये जाऊन पाहिजे ती सर्व कागदपत्रे भरून माझे अमेरिकेला येणे किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. थोडक्यात तेव्हा मला F-1, J-1, आणि B-1 व्हिसाची माहिती कळाली. एजंटनेपण सर्व गोष्टी नीट करून one-way तिकीट काढून दिले आणि B-1 व्हिसा घेऊन अस्मादिक दुसऱ्या वेळी अमेरिकेला परत पोहचले. एकदा अमेरिकेत पोहोचल्यावर ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी प्रथम नोकरी मिळवणे गरजेचे होते. मात्र इथे आल्यावर नोकरी मिळणे फार सोपे झाले. ७/८ महिन्यांनी माझे Post-doctoral काम आटोपून मी अमेरिकन सिमेंट कंपनीत R & D मध्ये नोकरी करू लागलो. ती नोकरी मिळाल्यावर २/३ महिन्यात ग्रीनकार्ड मिळाले आणि इतर गोष्टी सुरळीत झाल्या.

तर असा हा माझा अनुभव होता. अशाच प्रकारचे अमेरिकेतील स्थलांतराचे आणि व्हिसाचे अनुभव लिहून वाचकांनीसुद्धा ह्या उपक्रमात जर सहभाग घेतला तर  खूप बरे वाटेल.

Comments