स्मरणाचे व्रत

विदुला कोल्हटकर
यंदा बऱ्याच वर्षांनी आई-बाबा जूनमध्ये तिच्याकडे आले होते. एका शनिवारी सकाळी नेहेमीप्रमाणे तिचं लॅपटॉपवर काहीतरी चालू होत तेव्हा अचानक आईचा प्रश्न आला "साबुदाणा आहे का ग? या गुरुवारी माझा उपवास आहे.”
ती: "श्रावण तर अजून लांब आहे आता हा कसला उपास?”

आई: "वटपौर्णिमेचा”

ती हसली. त्या हसण्याचा अर्थ ओळखून आई म्हणाली "अग सावित्रीच्या बुद्धिमत्तेची, चातुर्याची आठवण म्हणून हा उपवास.”
ती: "हो हो!”

आई: "हे सात जन्म, तोच नवरा, हे सगळं तुमच्या सिनेमामुळे आलेलं आहे. सावित्रीच्या कथेत हे असलं काही नाही. हा निव्वळ फिल्मीपणा. पूर्वीच्या बायकांकडे दुसरं काय होत? म्हणून सावित्रीची, तिच्या हुशारीची आठवण यासाठी हा उपवास. स्मरण ठेवणं महत्वाचं.”

ती: "बरं. साबुदाणा आहे कपाटात. दाणे मात्र भाजावे लागतील.”

वा! या गुरुवारी आईच्या हातची खिचडी मिळणार तर! मनातल्या मनात ती खूष झाली. सत्यवानाचा एक वर्षांनी मृत्यू होणार आहे हे माहीत असतानासुद्धा एकदा मनाने ज्याला पती मानलं त्याच्याशीच लग्न करणार असं निग्रहाने सांगणारी, त्याच्या मृत्यूवेळी स्वतःच्या हुशारीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवणारी सावित्री खरंतर कथेच्या काळाच्या पुढचीच आणि तिचं स्मरण ठेवावं असं वाटण्यात काहीच गैर नाही. मात्र अक्षरश: लोकांचे शिव्याशाप, दगड आणि शेणाचा मारा झेलत काळाच्या पुढचा विचार करीत मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले अगदी वंदनीय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही नेटाने स्त्रीशिक्षणाचे कार्य पुढे नेण्यासाठी पुण्यातील भिडेवाड्यात सुरुवात करून एकंदर १८ शाळा सावित्रीबाईंनी आपल्या कारकीर्दीत सुरु केल्या. या शिक्षणाने अनेकींना किंवा खरंतर अनेक पिढयांना शिक्षणाची, अर्थार्जनाची आणि पुढे आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळाली. याच मार्गावर चालत स्मरणासाठी उपवास सोडून बऱ्याच गोष्टी करण्याची शक्यता ज्यांच्यामुळे फळाला आली त्या सावित्रीबाईंचं स्मरण आमच्या आणि पुढच्या पिढयांसाठी महत्त्वाचं.

“आई” लेकीच्या हाकेने ती विचारातून भानावर आली आणि परत लॅपटॉपमध्ये डोक घालून पत्र पूर्ण करायच्या कामाला लागली."... सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यात मुलींची शाळा सुरु करून १७० वर्षे झाली. त्यानिमित्त, त्यांच्या कार्याची आठवण म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जरूर यावे. सावित्रीबाईंचे कार्य आणि विचार आणखी  पुढे नेण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे...."

लेकीला आणि तिच्या मैत्रिणींना पण या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं पाहिजे. लॅपटॉप बंद करताना मनातल्या मनात पुढच्या कामाची नोंद करताना तिच्या मनांत विचार आला, "सावित्रीबाईंच्या कार्याचं, त्यागाचं, विचारांचं स्मरण ठेवणं महत्वाचं!"

- विदुला कोल्हटकर

हे लेखन मायबोली संकेतस्थळावर प्रकाशित झाले होते. 

Comments