संपादकीय

नमस्कार मंडळी,


२०२० ह्या वर्षातील 'मैत्र' चा दुसरा अंक आपल्यासमोर आणताना संपादक मंडळाला अतिशय आनंद होत आहे. दरवर्षी प्रमाणे बाल्टिमोर मराठी मंडळाच्या ह्या वर्षीच्या कार्यक्रमांची सुरुवात संक्रांतीच्या बहारदार कार्यक्रमाने झाली. संक्रांतीनंतर सगळ्यांना वेध लागतात ते वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि मराठी मंडळाच्या होळी आणि पाडवा ह्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. ह्यावर्षी मंडळाने ‘व्हाईट लिली अँड नाइट रायडर’ ह्या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता, पण घडले मात्र वेगळेच. जगभर पसरू लागलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव एव्हाना अमेरिकेमध्ये येऊन धडकला होता. त्याचा प्रसार हळूहळू वाढू लागल्याने, अमेरिकेमधील सार्वजनिक समारंभ रद्द होऊ लागले होते. ह्याचमुळे बाल्टिमोर मराठी मंडळाने योग्य वेळी निर्णय घेऊन ह्या नाटकाचा प्रयोग रद्द केला. ह्यामुळे लोकांची जरी निराशा झाली असली तरी मंडळाला खात्री आहे कि विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आणि सध्याची विस्कळीत स्थिती मार्गस्थ झाल्यावर मंडळ आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागून तुमच्यासमोर नवनवीन कार्यक्रम आणतील. 

तसे म्हटले तर ह्या प्रादुर्भावाने सगळे जगच बदलत आहे आणि एका नव्या अनुभवाला सामोरे जात आहे. इतरवेळी कंटाळवाण्या वाटणाऱ्या गोष्टी आता कदाचित आवडू लागल्या असतील.  छंद जोपासणे, व्यायाम करणे, पाककृती करून बघणे, जुने-नवे भारतीय-अभारतीय चित्रपट बघणे, मुलांबरोबर जास्त वेळ घालवणे, वसंत ऋतूतल्या पावसांत घरी बसून कॉफीचा आस्वाद घेणे, वाचन, लेखन, वगैरे गोष्टी एरवी कामाच्या रगाड्यात करायला जमत नव्हत्या त्या काहींना करता येत असतील. काहींना काम आणि घर ह्याचा ताळमेळ बांधणे अवघड जात असेलही, कारण घरातून काम करणे म्हणजे अधिक काम करणे आलेच. काही लोकांना कामावर जाणे आवश्यक असेल तर काही लोकांना दुर्दैवाने आपले काम गमवावेही लागले असेल.  पण तरी प्रत्येकजण आपल्या परीने आपल्या घरासाठी आणि इतरांसाठी मदतीचा हात पुढे करत आहे. अशावेळी कवी विं.दा.करंदीकरांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळी आठवल्याशिवाय राहात नाहीत. 


चुकली दिशा तरी ही हुकले ना श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे 

मी चालतो अखंड चालायचे म्हणून
धुंदीत ह्या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले कि अनुकूल सर्व वारे

मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटते तेथ न्यारे

आशा तशी निराशा हे श्रेय सावधांचे
बेसावध कैसे डसणार हे निखारे

आज ह्या प्रादुर्भावामुळे झालेल्या परिणामांनी काही लोक कंटाळलेले असतील तर काही हतबल झाले असतील. परंतु सध्या प्रदूषणाची पातळी घटत आहे आणि आपण स्वतःला आणि आपल्या पुढील पिढीला शिकविण्यासाठी अधिक वेळ देऊ शकत आहोत ह्या सध्याच्या वाईटातून घडणाऱ्या चांगल्या गोष्टीच! कालगणनेसाठी आपण सध्या जसे BC आणि AD वापरतो, त्याऐवजी करोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर आपल्याला BC आणि AC म्हणजे 'बिफोर करोना' आणि 'आफ्टर करोना' असे म्हणावे लागू नये हीच प्रार्थना!

जर सध्याच्या विलग्नवासामध्ये आपण काही नव्या गोष्टी करत असाल, पाककृती करत असाल, एखादी समाजोपयोगी गोष्ट करत असाल तर त्याबद्दलचे तुमचे अनुभव मैत्रच्या पुढील अंकासाठी जरूर पाठवा. ह्याशिवाय तुम्ही किंवा तुमच्या मुलांनी काढलेले फोटो, चित्रेसुद्धा आम्हाला पाठवू शकता. मैत्रचा पुढील अंक ३० जुलैला प्रकाशित होईल. त्यासाठी १५ जुलै पर्यंत तुमचे साहित्य editor@baltimoremarathimandal.org या पत्त्यावर पाठवा. 

मागील अंकामध्ये घोषित केल्याप्रमाणे बाल्टिमोर मराठी मंडळ आणि मराठी कला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या साहित्याची देवाणघेवाण ह्या उपक्रमांतर्गत ह्यावेळी 'हितगुज' मुखपत्रामधील ‘मुंबई एक स्वप्न नगरी’ व ‘येवा कोकण आपलोच असा’ हे दोन लेख  पृष्ठसंख्या मर्यादेमुळे झलक स्वरूपात प्रकाशित करत आहोत. संपूर्ण लेख हितगुजच्या मे महिन्यात प्रकाशित होणाऱ्या आगामी अंकामध्ये वाचता येतील.

महाराष्ट्राच्या विविध भागातून बाल्टिमोर परिसरात आलेल्या आपल्या शेजाऱ्यांची ओळख ‘गड्या आपुला गाव बरा’ या सदरातून आपल्याला होत असते. ह्या अंकात मुंबई, ठाणे जिल्हा, व कोंकण परिसरातून आलेल्या शेजाऱ्यांशी आपली ओळख होणार आहे. जुलै अखेरीस प्रकाशित होणाऱ्या पुढील अंकात आपण पुणे जिल्हा आणि परिसरातून आलेल्या आपल्या मराठी शेजाऱ्यांशी ओळख करून घेऊ. तुम्ही जर या परिसरातले असाल तर आम्हाला editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्यावर तुमची माहिती नक्की कळवा.

तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

कळावे,
संपादक मंडळ



Comments