येवा कोकण आपलोच असा!

छायाचित्र संदर्भ:
http://divcomkonkan.gov.in/Document/
en/page/MapGallery.aspx

कोकण म्हटलं की समुद्रकिनाऱ्याशी समांतर सह्याद्री पर्वतरांगेची गुंफण, त्यामुळे अनेक नागमोडी वळणांचे उंचसखल घाटरस्ते, नयनरम्य अशी हिरवी दाट झाडी व शेती हे दृश्य डोळ्यांसमोर येते. पहाटेचं धुकं, त्यामधून रास्ता कापणारी, माडा-झावळ्यांचा अडसर दूर करून पडणारी सूर्याची कोवळी किरणं, त्यामुळे उजळणारी लाल कौलारू घरं, आणि त्याबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट, कोकिळेची तान, काकड आरत्या आपल्या कानात फेर धरू लागतात. असा हा कोकण भाग म्हणजे या भूतलावरील स्वर्गच आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. भारताला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा असणारी कोकण किनारपट्टी लाभली आहे. किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेली ही कोकणपट्टी अपार निसर्गसौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या रांगा, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती यांनी कोकणाची जमीन संपन्न केली आहे. अतिशय सुपीक जमीन, मुबलक पाणी पुरवठा आणि पाऊस असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

घाटावरुन जेव्हा तुम्ही कोकणात उतरुन तिथल्या गावात प्रवेश करता तेव्हा तुमचे स्वागत करते ती कोकणातली लाल माती, नारळाची उंच झाडं, सुंदर गडद रंगांची फुलं त्यांचा सुवास आणि अशा कित्येक गोष्टी. एखाद्या बस थांब्यावर जेव्हा गाडी थांबते व तुच्यात तिथल्या स्थानिक लोकांचा प्रवेश होताच गाडीत मासे, रानमेवा, आंबा, फणस, अबोली, बकुळ, सुरंगीची फुले असा एक मिश्र वास येतो.

प्रवासासाठी रस्ता व रेल्वे ही प्रमुख साधने असली तरी आता समुद्र वाहतुकीचा वापर वाढत आहे. कोंकण रेल्वे हे आश्चर्य २५ वर्षापूर्वी ई. श्रीधरन हयांच्या निष्णात व्यवस्थापनातून निर्माण झाले. अत्यंत दुर्गम भागातील ह्या बांधकामात ९२ बोगदे व १७९ मोठे पूल ह्यांच्या निर्मितीने अनेक विक्रम प्रस्थापित झाले. रत्नागिरीजवळ पानवल नदीवर असलेला पुल भारतातील सर्वात उंच तर एशिया खंडातील ३ नंबरचा उंच पूल आहे. कोंकण रेल्वेवरील सर्वात लांब बोगदा रत्नागिरीतील उक्षी व भोके स्थानकांमधील करबुडे ठिकाणी असुन त्याची लांबी तब्बल ६.५ किमी. आहे. १९८६ मध्येच रोह्यापर्यंत पोचलेल्या कोंकण रेल्वेचे काम २६ जानेवारी १९९८ला पूर्ण झाले.

अलिबागला जाण्यास बोट वाहतूक गेट वे ऑफ इंडियावरून गेली अनेक वर्षे उपलब्ध आहे, परंतु ती पावसाळयात बंद असते. आता मात्र स्वतःची कार बोटीत घेऊन जाण्याची रो-रो कार फेरी सेवा भाऊचा धक्का येथून वर्षभर सुरु असते.

कोकणातील पाउस हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. कधी मुसळधार, तर कधी रीपरीप असा कित्येक दिवस नुसता पडतच असतो. पावसात सगळीकडे भाताची शेती केली जाते. त्याची सर्वत्र लुसलुशीत पाती पाहिली की जमीन हिरवा शालु परिधान केलेल्या नविन नवरीसारखी दिसते. डोंगरातुन भरभरुन कोसळणारे कलावतीची सुंदर गडद फुले, त्यांच्या पानावर संततधार पडणारा पाउस बघत तुमचा वेळ कसा जातो ते कळतच नाही. जीवनशैली चाकोरीबद्द झालेल्या शहरी चकरमान्याला हे सर्व भरभरून अनुभवता येतं. म्हणूनच इथे दरवर्षी पावसाची मजा घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.

कोकणाबद्ल जितकं लिहावं तितकं कमीच आहे. एकदा मन तिथं गेलं की परत यावंसं वाटत नाही. आपण खूप नशिबवान म्हणून आपल्याला हे सर्व अनुभवता आलं असं कायम वाटत राहतं. परशुरामांची ही पावन भूमी सर्वांना अनुभवता येवो.

------------------------------

बाममं आणि मराठी कला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या साहित्याची देवाणघेवाण ह्या नव्या उपक्रमाअंतर्गत 'हितगुज'च्या आगामी अंकामधील दोन लेख झलक स्वरूपात सादर करत आहोत. मैत्रच्या ह्या अंकातील गड्या आपुला गाव बरा सदारांतर्गत मुंबई-ठाणे-कोकण ह्या भागातील शेजाऱ्यांशी आपली ओळख होणार आहे. त्याच प्रदेशांविषयी माहिती देणारे हितगुजच्या अंकांमधील लेख प्रकाशनार्थ निवडले आहेत. दोन्ही लेख अनेकपानी आहेत. मैत्रच्या पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे दोन्ही लेखांतील सुरुवातीचे भागच केवळ प्रकाशित केले आहेत. संपूर्ण लेख हितगुजच्या मे महिन्यात प्रकाशित होणाऱ्या अंकात वाचण्यास मिळतील.

लेखक चमू - रवि मनोहर, अतुल पत्की, ऐश्वर्या हरेर, दिनेश जाधव, प्राजक्ती प्रभू, प्रवीणा अनिखिंडी

Comments